रत्नागिरी:- आरटीईच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अखेर 10 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यास अनुसरून पात्र पाल्यांच्या सर्व पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जि. प. शिक्षण विभागाने केले आहे. मुदतवाढ ही पालक व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची असली तरी आता वाढीव मुदतीत किती अर्ज येतील, याबाबत संभ्रमावस्था आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 138 जणांचेच अर्ज वैध ठरले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 10 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी 30 एप्रिलपर्यंत मुदत होती. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 76 हजार 52 शाळांमधील आठ लाख 86 हजार 411 जागांकरिता मंगळवारी रात्रीपर्यंत केवळ 62 हजार 277 अर्ज आले होते. जिल्ह्यात 12 हजार 345 जागा असताना आतापर्यंत फक्त 138 अर्ज दाखल झाले आहेत. अधिकाधिक पालकांनी अर्ज भरावेत म्हणून मुदतवाढ दिल्याचे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.
आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. यंदा प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांमधील प्रवेशाचा पर्याय प्राधान्याने दिसणार आहे. बंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तरच त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत आरटीई जागांवर प्रवेश मिळेल, असा नवा निर्णय सरकारने घेतला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा, विशेषत: इंग्रजी शाळा वगळण्यात आल्याने पालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे.
या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा आरटीईच्या तरतुदीत बदल केला असून, आता 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांमधील प्रवेशाचा पर्याय प्राधान्याने दिसणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत सरकारने बदल केल्यामुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नोंदणीला अल्प प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. अधिकाधिक पालकांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत, बालकांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज भरावेत, यासाठी शिक्षण विभागातर्फे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. जिल्ह्यात 12 हजार 345 जागांसाठी फक्तक्त 138 अर्ज वैध ठरले आहेत. यासाठी 631 जणांनी अर्ज दाखल केले होते. विशेष
म्हणजे मंडणगड, राजापूर या तालुक्यांतून एकही अर्ज वैध ठरला नाही.