बेलबाग येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक

रत्नागिरी:- शहरातील बेलबाग येथील भाजीविक्रेत्याच्या भाड्याने घेतलेल्या घराला रविवारी (ता. ५) रात्री आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमध्ये संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. त्यामध्ये भाजी दलालाला देण्यासाठी ठेवलेले सुमारे १ लाख रुपये रोख आणि टीव्ही, फ्रीजसह सर्व वस्तू जळून गेल्या.

नुकसान झालेल्या भाजीविक्रेत्याचे नाव झोरे असे आहे. या आगीची झळ शेजारच्या घरालाही बसली. त्या घरात झोरे यांचे भाऊच राहतात. बेलबागेत एका इमारतीच्या तळमजल्यावरील दोन खोल्यांमध्ये भाजीविक्रेते झोरे भाड्याने राहत होते. ते दोघे रविवारी व्यवसायासाठी घराबाहेर गेलेले होते. बंद असलेल्या घरातून रात्री धूर येत असल्याने लक्षात आले. नागरिक धूर येत असलेल्या इमारतीजवळ एकवटले. याची माहिती शेजाऱ्यांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला कळविली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. वाहनचालक नरेश जाधव, इलियास काझी, फायरमन यशवंत शेलार, नरेश मोहिते, शिवम शिवलकर, रोहन गजने आणि सुरक्षारक्षक हरेंद्र विजय चव्हाण यांच्यासह रत्नागिरी नगरपालिकेच्या विद्युत आणि वाहन विभागाचे अधिकारी जितू विचारे हेही होते. विद्युत विभागाचे अधिकारी

जितू विचारे यांनी आग लागल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर लगेचच परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे आग विझवण्याच्या कामात सुसूत्रता आली. पालिकेच्या अग्निशमन जवानांनी ही आग विझवली. बेलबागमध्ये ज्या ठिकाणी आग लागली तेथे जाणारा रस्ता अरूंद असल्यामुळे अग्निशमन बंब घटनास्थळी नेताना अडचण आली. तरीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली. भीषण आगीमध्ये घरातील टीव्ही, फ्रीजसह १ लाख रुपयांच्या नोटा जळून गेल्या. शेजारी रहाणाऱ्या त्यांच्या भावाच्या घराचेही नुकसान झाले.