पाणी सोडण्याच्या कारणावरून शिपायाला मारहाण

चिपळूण:- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चिपळूण तालुक्यात विकासाचे राजकारण तापले आहे; मात्र पाण्यावरून गावोगावी भांडणे सुरू आहेत. नारदखेरकी येथे पाणी कधी सोडणार, याचा जाब विचारत चक्क ग्रामपंचायतीच्या शिपायाला मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.

नारदखेरकी येथे ३ मे रोजी गावातील जयंत जाधव यांच्या घरी पाण्याच्या विषयावरून बैठक सुरू होती. या दरम्यान ग्रामपंचायतीचे शिपाई चंद्रकांत जाधव हे जेवण करण्यासाठी बसले होते. यावेळी शांताराम बामणे, दत्ताराम बामणे, अशोक जाधव, रघुनाथ चाळके यांनी चंद्रकांत जाधव यांना पाणी कधी सोडणार, याबाबत जाब विचारत त्यांना मारहाण केली. या मारहाणीत जाधव यांच्या कानाचा पडदा फाटला आहे. संशयितांनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात संशयित चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.