कोकण किनारपट्टी भागात उन्हाचा जोर वाढला

रत्नागिरी:- मळभी वातावरणाचे सावट दुर झाल्यानंतर कोकण किनारपट्टी भागात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील काही दिवस कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. या कालावधीत उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अरबी सागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आकाश निरभ्र होत झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. दरम्यान, उन्हाचा चटका कायम असल्याने तापमानात वाढ झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा तसेच उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.पुढील काही दिवस कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 35 अंश सेल्सिअस तर रत्नागिरी जिल्ह्यात 37 अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होऊन ते 40 अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात 25 अंश सेल्सिअस राहील. पालघर जिल्ह्यात 26 अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत 27 अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 71 ते 84 टक्के, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत 52 टक्के आणि ठाणे जिल्ह्यात 41 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात 30 टक्के तर रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांत 20 टक्के राहील.
वार्‍याचा ताशी वेग 8 ते 10 किमी राहील. वार्‍याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील ठाणे, रायगड सिंधदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण लाट, उष्ण व दमट हवामानाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी सकाळी 10 वाजता कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस होते. दुपारी 12 वाजता पारा 33 अंशापर्यंत पोहचला होता. रत्नागिरी शहर किनारी भागात असल्याने शहरातही तापमान वाढीचा वेग होता. त्यातच निवडणुकीचा प्रचार सभा आणि निवडणुकीचा माहोल असल्याने वाढत्या तापमानात पक्षाचे कायकर्ते आता घामाघूम होऊ लागले आहेत.