पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ भरण्याचे आदेश

रत्नागिरी:- जलयुक्त शिवार अभियान 2.0 शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या अभियानात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल, तर नवीन पदनिर्मिती करुन ही पदे भरण्याचे निर्देश राज्य शासनाने प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. या अभियानात स्वयंसेवी संस्थांचा अधिकाधिक सहभाग वाढवून त्यांच्या मदतीने अभियानाला गती देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

2014 ते 2019 या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा अतिशय परिणामकारक पद्धतीने राबविला गेल्यामुळे भूजलपातळीचा स्तर उंचावण्यास मदत झाली. अनेक गावांतील पाणीटंचाई समस्या कमी झाली. आता पुन्हा नव्याने राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यास सुरुवात केली आहे. कृषी, मृद व जलसंधारण यासह विविध यंत्रणांचा यामध्ये सहभाग आहे. या सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि एकत्रितपणे जोमाने काम केल्यास हे अभियान यशस्वी होण्यास निश्चित मदत हाणार आहे. त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे कोकणात राबविण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये स्थानिकांचा अधिकाधिक सहभाग घेणे, स्वयंसेवी संस्थांची मदत आणि गावपातळीवर शासकीय यंत्रणांचा प्रत्यक्ष सहभाग अशा एकत्रितपणे हे अभियान पुढे नेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यानुसार या उपक्रमात लोकसङभाग घेण्यात येणार आहे. सध्या याकामी मनुष्यबळाची कमतरता जाणवत असेल, तर स्वतंत्र पदनिर्मिती करुन ती पदे भरण्यात येणार आहे.