पर्ससीन नेट मासेमारी अंतिम टप्प्यात

मच्छिमारांची आवराआवर सुर

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारी बंद करण्याची आवराआवर सुरू झाली आहे. समुद्रातील जोरदार वार्‍यामुळे मासेमारी नौका समुद्रात जाणे धोकादायक होते. या पार्श्वभूमीवर आणखी आर्थिक भुर्दंड पडू नये यासाठी नौका मालकांनी यापूर्वीच आपल्या नौका बंदरात उभ्या करून मासेमारी बंद केली आहे. दरवर्षी १० मे नंतर पर्ससीन नेट मासेमारी करणार्‍या नौका समुद्रात जात नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यात २ हजार ५२० सागराr मासेमारी नौका असून त्यामध्ये २८० पर्ससीन नेट नौकासुद्धा आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बहुसंख्य नौकांना खर्चाइतकीही मासळी मिळालेली नाही. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात जोरदार वारे वहात आहेत. या पार्श्वभूमीवर बहुसंख्य नौका मालकांनी १० मे पूर्वीच नौका बंदरात आणून उभ्या केल्या आहेत.

पर्ससीन नेट नौकांवर तांडेल आणि खलाशी असे ३० ते ३५ जण कामगार असतात. या तांडेल आणि खलाशांना १० मे पर्यंतच्या मुदतीसाठी कामावर घेतलेले असते. त्यांना आठवड्याचा पगार द्यावा लागतो. त्याचबरोबर मच्छिमार नौकांवर जेवणाचे जिन्नस भरून द्यावे लागते. मासे मिळत नसल्याने खर्च परवडत नाही यामुळे पर्ससीननेट मच्छिमारांनी नौका किनार्‍यावर घेण्यास सुरुवात केली आहे.