बचत गटाच्या महिलांची फसवणूक करणाऱ्याला जामीन

खेड:-.तालुक्यातील बचत गटातील महिलांना शासनामार्फत सवलतीच्या दरात शिलाई मशिनसह घरकुल देण्याचे आमिष दाखवत २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी बबन मारुती मोहिते याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.

महाराष्ट्र क्रांती सेना संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील बचत गटांच्या महिलांना शासनाकडून महागडी हातशिलाई मशिन, घरकुल, घरघंटी व गोठा सवलतीच्या दरात देण्याचे आमिष दाखवत संदीप शंकर डोंगरे (रा. वाराणी- कासार, बीड) व बबन मोहिते या दोघांनी तब्बल ९३८ महिलांची २३ लाख रुपयांची फसवणूक करत पोबारा केला होता. यातील मुख्य सूत्रधार संदीप डोंगरे याला यापूर्वीच करण्यात आली होती. गेल्या दहा महिन्यांपासून फरारी असलेल्या बबन मोहिते याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने मुंबई येथून मुसक्या आवळत त्याला येथील पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्याच्या जामिनासाठी करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी झाली. ॲड अश्विन भोसले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.