लोकसभा मतदानानंतर शिक्षक भरतीचा मार्ग होणार खुला

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमध्ये पवित्र पोर्टलमधून 1 हजार 14 जणांची नियुक्ती झाली खरी, परंतु अंतिम नियुक्तीपत्र देताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आड आली होती. याबाबत प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. हे मार्गदर्शन आलं असून मतदान झाल्यानंतर या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे मे च्या दुसर्‍या आठवड्यात हे 1 हजार 14 शिक्षक मिळणार आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन शासनाने 1 हजार 68 पदांवर उमेदवारांची भरती केली होती. त्यापैकी 1 हजार 14 च उमेदवार या प्रक्रियेला हजर राहिले होते. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. मार्च महिन्यात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. मात्र शाळांमधील रिक्त पदांवर नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्यापुर्वी जिल्ह्यातील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या कराव्यात अशी मागणी संघटनांनी केली होती. याची दखल राज्य शासनाने घेतली.

याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. हे मार्गदर्शन आले असून हे मार्गदर्शन पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झालं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेचा कालावधी नियुक्तीच्या प्रक्रियेवर निर्बंध आले. या विषयाची तातडीने तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळाण्यासाठी सूचना आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रास्ताव सादर केला होता. त्यानुसार आता ज्या जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया होईल त्या तारखेनंतर ही बदली प्रक्रिया करावी, असे आदेश दिले आहेत.