मच्छीमारांना डिझेल परताव्यापोटी 14 कोटी प्राप्त

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 350 मासेमारी नौका मालकांना वर्षभरात 46 कोटी रुपयांचे डिझेल परतावा अनुदान वितरीत करण्यात आले. उर्वरीत नौका मालकांना 14 कोटी रुपये कोषागार कार्यालयाकडून सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून दिले जाणार आहेत. हा 14 कोटी रुपयांचा धनादेश वटून मत्स्यव्यवसाय विभागाकडे रक्कम प्राप्त झाल्यानंतर परतावा वाटप केले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्रात जिल्ह्यातील 2 हजार 520 नौकांकडून मासेमारी केली जाते. त्याचबरोबर जिल्ह्यात 85 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था असून, या संस्थांचे सुमारे 41 हजार नौका सदस्य आहेत. या सहकारी संस्थांपैकी 28 सहकारी संस्था डिझेल परतावा अनुदानाच्या यादीत आहेत.
डिझेल परताव्याच्या यादीत असलेल्या 28 सहकारी संस्थांमधील सुमारे 1473 सदस्य नौका परताव्यासाठी पात्र आहेत. गेल्या वर्षभरात म्हणजे सन 2023-24 मध्ये सुमारे 60 कोटी रुपयांचे डिझेल परतावा अनुदान प्राप्त झाले. अनुदानाचे धनादेश कोषागार कार्यालयाकडे दिल्यानंतर ती रक्कम सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयाला मिळते. येथून ती रक्कम निकषानुसार नौका मालकांच्या खात्यात जमा होते. डिबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम वर्ग होत असते. जे 46 कोटी रुपये मिळाले ती रक्कम डिझेल परताव्यासाठी पात्र असणार्‍या नौका मालकांच्या खात्यात वर्ग झाली आहे.