जिल्ह्यात वर्षभरात अडीच हजार जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्यावर्षी सन 2022-23 मध्ये विविध कारणांमुळे 10 हजार 805 रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयांमध्ये साथीच्या आजारांतील हिवताप, विषमज्वर किंवा टायफाईड, गॅस्ट्रो, अतीसार, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूने गेल्यावर्षी एकही मृत्यू झाला नाही. परंतु हृदयविकाराच्या आजाराने सर्वाधिक 2 हजार 430 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासन सहाय्यीत किंवा सार्वजनिक वैद्यकीय सुविधांतर्गत 5 दवाखाने, 65 प्रसृतीगृह, 67 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 378 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांमध्ये वेेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू झाले असले तरी जिल्हा आरोग्य विभागाकडील माहितीनुसार साथीच्या आजारांतील हिवताप, विषमज्वर किंवा टायफाईड, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूने एकही मृत्यू झालेला नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये वेळेत उपचार केले गेल्याने या आजाराने मृत्यू झालेला नाही. साथीच्या आजारातील क्षयरोगने 93 तर श्वसन क्रियेसंबंधीत आजाराने 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बिगर साथीच्या आजारामध्ये हृदयविकार येतो. या हृदयविकाराने सर्वाधिक 2 हजार 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी वयातही या विकाराने मृत्यू झाले आहेत. कर्करोगाने 294 तर एड्सने 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
बाळंतपणात 6 मातांचा मृत्यू झाला आहे. पक्षघाताने 567, मूत्रपिंडच्या आजाराने 1 हजार 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या प्रकारातील मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामध्ये 115 आत्महत्त्या असून रहदारी वाहतुकीने 195 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर अपघातांमध्ये 18 मृत्यू झाले आहेत. इतर अनेक कारणांनी मृत्यू होतात. हे मृतदेह शासकीय रुग्णालयांमध्ये आणले जातात. अशा मृत्यूंचे प्रमाणही मोठे आहे. 5 हजार 460 मृत्यू अशा इतर कारणांमुळे झाल्याची नोंद आहे.