रत्नागिरी:- बँकांच्या अस्तित्वावरूनच आर्थिक विकासाचा स्तर मापला जातो. बँकांच्या संख्येवरून आर्थिक विकासाची ओळख होते. या मापदंडावरून रत्नागिरी जिल्ह्याचा आर्थिक विकास होत असल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गावे आणि शहरांमध्ये गेल्या पाच वर्षात बँक शाखांमध्ये 74 ने वाढ झाली आहे. रत्नागिरी, चिपळूण, दापोली तालुक्यांमध्ये वर्गीकृत बँकांच्या शाखा कार्यालयांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
धन, वित्त संग्रह किंवा संचित करून त्यातून लाभ मिळवणे हे बँकांचे प्रमुख कार्य असते. ज्या ठिकाणी धन, पैसा किंवा इतर मौल्यवान वस्तूंची भरभराट दिसून येत असते त्याच ठिकाणी बँकांची कार्यालये उघडली जातात.
आताच्या आधुनिक काळात बँक प्रणाली अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार बनली असून बँका अर्थव्यवस्थेची जीवनरेखा म्हणूनही ओळखली जावू लागली आहे. बँका चार भागात वर्गीकृत आहेत. अशा वर्गीकृत बँकांच्या शाखा कार्यालयांची संपूर्ण जिल्ह्यातच वाढ होत असून रत्नागिरी, चिपळूण, दापोली हे तालुके आघाडीवर आहेत.
उद्योग, व्यापार ज्या ठिकाणी वाढत जातो, त्याठिकाणी बँकांची कार्यालये सुरू करण्यास प्राधान्य दिले जाते. अशा बँकांमुळे तेथील उद्योग, व्यापार किंवा तत्सम कारभाराला चालना मिळत जाते.
आतातर बँका नसतील तर सर्व उद्यमता ठप्प होण्याची भिती असते. बँकांकडून अनेक सेवा दिल्या जावू लागल्या आहेत. त्यामुळे बँक ही संस्था जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन 2016-17 मध्ये बँकांची शाखा कार्यालये ही 141 गावे आणि शहरांमध्ये होती. त्याचवेळी वर्गीकृत बँकांची 309 शाखा कार्यालये होती. सन 2022-23 मध्ये ती 307 गावे आणि शहरांपर्यंत पोहोचली. तर वर्गीकृत बँकांची शाखा कार्यालये 74 ने वाढून 383 पर्यंत पोहोचली. जिल्हा अग्रणी बँकेकडील नोंदीनुसार सन 2022-23 मध्ये मंडणगड तालुक्यात 18, दापोलीत 38, खेड 42, चिपळूण 67, गुहागर 25, रत्नागिरी 97, संगमेश्वर 35, लांजा 23 आणि राजापूर तालुक्यात 38 बँक शाखा कार्यरत होत्या.
आधुनिक चलनाच्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या बँकांच्या शाखांमध्ये होणारी वाढ जिल्ह्याचा विकास होवून त्यातून आर्थिक विकास साध्य होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे सन 2016-17 मध्ये मंडणगड तालुक्यात केवळ 19 शाखा कार्यालये होती. दापोली 31, खेड 35, चिपळूण 53, गुहागर 9, रत्नागिरी 82, संगमेश्वर 25, लांजा 18 आणि राजापूर तालुक्यात 29 शाखा होत्या.