संगमेश्वर:- संगमेश्वर येथे दारूच्या नशेत खोदलेल्या विहिरीत पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वा. घडली आहे. अशोक लक्ष्मण राठोड (३८, मूळ रा. विजापूर, कर्नाटक. सध्या रा. माळवाशी कडूवाडी संगमेश्वर) असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत त्याच्या पत्नीने देवरुख पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, अशोकला अती दारु पिण्याचे व्यसन होते. तसेच तो जिथे काम मिळेल तिथे झोपडी बांधून विहीर खणण्याचे काम करायचा. गेले काही दिवसही तो संगमेश्वर येथे एक विहीर खणण्याचे काम करत होता. त्यावेळी दारु पिउन तो झेपा टाकत विहिर खणलेल्या ठिकाणी गेला असता त्याच्या पत्नीने त्याला धरुन झोपडीत आणले होते. शनिवारी दुपारीही अशोक दारुच्या नशेत झेपा जात असाताना देखील खणलेल्या विहिरीजवळ गेला असता त्याचा तोल जाउन तो विहिरीत जाउन पडला. ही बाब त्याच्या पत्नीच्या निदर्शनास येताच तिने आजुबाजूच्या नागरिकांच्या मदतीने अशोकला विहिरीबाहेर काढून देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी अशोकला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.