कोकण रेल्वे मार्गे उन्हाळ्यासाठी दोन विशेष गाड्या

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गे उन्हाळी हंगामासाठी दोन विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील थिवीदरम्यान या विशेष गाड्यांच्या एकूण ३२ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार 01187 क्रमांकाची गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीत आठवड्यातून एकदा दर गुरुवारी धावणार आहे. ही विशेष गाडी मुंबईतील एलटीटीहून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी थिवीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. 01188) थिवी स्थानकावरून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटून शनिवारी पहाटे पावणेचार वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी एकूण २२ डब्यांची एलएचबी श्रेणीतील गाडी असेल.

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी येथे ही गाडी थांबेल.

दुसरी विशेष गाडी (क्र. 01129/01130) लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीदरम्यान धावणार आहे. ही गाडी येत्या २० एप्रिलपासून ८ जूनपर्यंत आठवड्यातून एकदा दर शनिवारी धावणार आहे. ती २२ आयसीएफ डब्यांची असेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी थिवीला सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. 01130) २१ एप्रिल ते नऊ जून या कालावधीत फक्त रविवारी धावेल. थिवी येथून ही गाडी सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेचार वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडीसुद्धा ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबेल.