जिल्हा रुग्णालयात खुब्याच्या सांधा बदलाची शस्त्रक्रिया यशस्वी

रत्नागिरी:- प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही असली तरीही काही क्षेत्रातील घराणेशाही राखून ठेवण्यासाठी जिद्द, चिकटी, मेहनतीसोबतच कष्टाची आवश्यकता असते. राजकारणात वडिलांच्या नावावर संधी मिळते. मात्र वैद्यकिय क्षेत्रात वडिलांच्या जागी संधी भेटण्यासाठी अपार मेहनत, अभ्यास, प्रॅक्टीस करावी लागते. अशीच मेहनत करुन अस्थिरोग तज्ञ झालेल्या डॉ. निखिल देवकर यांनी अपघातामुळे खुब्याचे हाड मोडल्यामुळे अंथरुणाला खिळलेल्या खेड कळंबणी येथील चंद्रकांत सुतार यांच्या खूब्याचा संपुर्ण सांधा बदली करुन त्यांना नवे जिवन दिले आहे. प्रचंड खर्चिक शस्त्रक्रिया डॉ. निखिल देवकर यांनी जिल्हा रुग्णालयात मोफत केली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झालेला रुग्ण स्वत:च्या पायांवर चालत आपल्या घरी गेला आहे. यावेळी चंद्रकांत सुतार यांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता.

खेड तालुक्यातील कळंबणी येथील चंद्रकांत सुतार यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या उजव्या खुब्याचे हाड पुर्णत: मोडले होते. यासाठी खुब्याचे सांधा बदली करणे आवश्यक होते. सांधा बदली हि शस्त्रक्रिया खुपच खर्चिक असल्याने व विशेष करुन रत्नागिरीत अशी शस्त्रक्रिया होत नसल्याने व मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करणे श्री.सुतार यांना शक्य नव्हते. त्यामुळे महिनाभर ते अंथरुणाला खिळले होते.
सरकारी रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया होऊ शकते यांची माहिती त्यांनाही नव्हती. रत्नागिरीकरांना सुपरिचित असलेले अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रल्हाद देवकर यांची दुसरी पिढी म्हणजेच डॉ. निखिल देवकर हे जिल्हा रुग्णालयात असल्याची माहिती श्री.सुतार यांच्या नातेवाईकांना मिळाली. त्यांनी डॉ. निखिल देवकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आणण्याची सुचना केली.
सुतार कुटुंबिय चंद्रकांत सुतार यांना घेवून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. आवश्यकता चाचण्याझाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय येथे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २ एप्रिल रोजी डॉ. निखिल देवकर यांनी चंद्रकांत सुतार यांच्यावर सांधा बदलीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केली. शस्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासूनच पेशंट पूर्वीप्रमाणे चालू लागले होते.शस्त्रक्रियेनंतर उपचार घेवून श्री. सुतार स्वत:च्या पायाने चालत आपल्या घरी गेले. रुग्णालयातून डिचार्ज घेताना त्यांनी डॉ. निखिल देवकर यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील टिमचे आभार मानले.
जिल्हा रुग्णालयातीचे माजी जिल्हा शल्यचिकित्सक व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रल्हाद देवकर यांचे डॉ. निखिल हे चिरजिंव आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत यांनी अस्थिरोग विषयात विशेष कौशल्य प्राप्त केले आहे. अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी करुन डॉ. निखिल देवकर यांनी जिल्हा रुग्णालयाचे नाव उज्वल केले आहे.