गुहागर:- पिंपर (ता. गुहागर) येथे नदीच्या पाण्यात विजेचा प्रवाह सोडून मासेमारी करताना एकाचा मृत्यू झाला. पिंपर येथील मठवाडीमधील दोघेजण काल (दि. ५ एप्रिल) नदीवर मासेमारीसाठी गेले होते.
नदीतील मासे लवकरात लवकर पकडण्यासाठी त्यांनी नदीशेजारी असणाऱ्या विजेच्या खांबावर अनधिकृतपणे वायर टाकून विजेचा प्रवाह नदीतील पाण्यात सोडला. याच वेळी या दोघांमधील संदेश दवंडे याला पाण्यात विजेचा प्रवाह सोडल्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर त्याला तत्काळ विद्युत प्रवाहाचा धक्का लागला. त्यामुळे तो जागीच मरण पावला. मुकेश नावाचा त्याचा साथीदार त्याला वाचवताना जखमी झाला.
गावात ही घटना समजताच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या दोघांना चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे संदेश दवंडे मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसऱ्या जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल वायंगणकर व गुहागर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.