रत्नागिरी:- मराठी संवर्धन, मराठीचा जागर करण्याकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन येत्या शनिवारी ६ व आणि रविवारी ७ एप्रिल रोजी मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अनुपमा उजगरे भूषवणार असून स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत आहेत.
लॅंडमार्क हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाची माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर व संमेलन संयोजन समितीचे प्रमुख रमेश कीर यांनी दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा संमेलनाचे कोषाध्यक्ष आनंद शेलार, संमेलन कार्याध्यक्ष गजानन पाटील, प्रमुख कार्यवाह माधव अंकलगे, नलिनी खेर आणि उपस्थित होते.
कोमसापच्या कोकणात ७२ शाखा कार्यरत असून सर्व शाखा दरवर्षी मराठीच्या संवर्धनासाठी किमान ४ कार्यक्रम करतात. तसेच प्रत्येक जिल्ह्याचे साहित्य संमेलन होत असते, असे नमिता कीर म्हणाल्या. संमेलनात शनिवारी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येईल. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित राहणार आहेत. १० ते १२.३० या वेळेत उद्घाटन कार्यक्रमाला संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, साहित्यिक सुरेश जोशी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच कोमसापचे विश्वस्त रमेश कीकर, अरुण नेरूरकर, केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी उपस्थित राहतील.
दुपारी १२.३० ते २ या वेळेत पुस्तकं… सांगतात खूप काही या परिसंवादात प्रा. बाळासाहेब लबडे, जयू भाटकर, मदन हजेरी, जयश्री बर्वे संवाद साधतील. अध्यक्षस्थान साहित्यिक प्रा. सुरेश जोशी भूषवतील. दुपारी २ वाजता भोजन, ३ वाजता कविता पद्य पदन्यास या आगळ्या कार्यक्रमात अमेय धोपटकर व सहकारी सादरीकरण करतील. सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत युवक आणि समाज माध्यमांवरील लेख या विषयावरील परिसंवादत माधव अंकलगे, अरुण मोर्ये, राजेश गोसावी, शाहिद खेरटकर, युयुत्सू आर्ते संवाद साधतील. अध्यक्षस्थानी कोमसापचे पदाधिकारी गोविंद राठोड आहेत.
सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत नैऋत्येकडील वारा या कवीसंमेलनात प्रा. एल. बी. पाटील, सुधीर शेठ, प्रविण दवणे, रुजारियो पिंटो, उषा परब, लता गुठे, आकांक्षा भुर्के व गझलकार देविदास पाटील व सहकारी सहभागी होतील. याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर भूषवणार असून अरुण म्हात्रे संवादक आहेत. रात्री ८ वाजता स्नेहभोजनानंतर ९ वाजता कोकणातील लोककलांचा सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. यात कोळीनृत्य, जाखडी, मंगळागौर, नमन, समई नृत्य, पोवाडा व इतर कार्यक्रम आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता बदलते कोकण यावर परिसंवाद होणार आहे. यात पर्यटन व उद्योगावर रमेश कीर, सांस्कृतिकवर नितीन जोशी, शैक्षणिक बाबत डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, पत्रकारिता या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत संवाद साधतील. प्रमोद कोनकर याचे संवादक आहेत. रविवारी सकाळी ११.१५ ते १ या वेळेत कवितेच्या गावा जावे यात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, एल. बी. पाटील, अनुपमा उजगरे कवी सादर सादर करतील. बालसाहित्याच्या प्रांगणात हा दुपारी १ ते २ विशेष कार्यक्रम भारत शिक्षण मंडळाचे कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचे विद्यार्थी कथा, कविता, नाट्यछटा, गाणी, एकांकिका असे विविधांगी सादरीकरण करणार आहेत. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील कवींचे कवी संमेलन होणार असून यात प्रमुख अमेय धोपटकर व अरुण मौर्ये असून उज्ज्वला बापट, शुभदा मुळ्ये व जिल्ह्यातील इतर शाखांमधील कवी सादरीकरण करतील. संमेलनाचा समारोप ४.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे.