मिरजोळे-हनुमाननगर येथे बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-हनुमाननगर येथील बांधकाम व्यावसायिकाने अज्ञात कारणातून घराशेजरील विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. ही घटना रविवार 31 मार्च रोजी सायंकाळी 5.10 वा.सुमारास उघडकीस आली.

रुद्राप्पा विरुक्षप्पा इंडिगिरी (60,रा.हनुमाननगर मिरजोळे,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. रविवारी दुपारी 2.30 वा. सुमारास जेवण झाल्यानंतर रुद्राप्पा इंडिगिरी हे अंगणात फेर्‍या मारत होते. त्यावेळी त्यांची मुलगी मंजुळा हि त्यांना झोपण्यासाठी बोलवण्यास गेली असता तिला ते कोठेही दिसून आले नाहीत. म्हूणन तिने आणि तिच्या भावाने आजुबाजुला त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा शेजारीच राहणार्‍या विजया सुर्वे यांच्या विहिरीत त्यांना रुद्राप्पा यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. आजुबाजुच्या शेजार्‍यांनी दोरीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.