देवगड:- देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली. या नौकेवरील ८ पैकी ७ खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. नितीन जयवंत कणेरकर (वय ४३, रा. कणेरी, राजापूर) असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे. ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, देवगड बंदरातील तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका मच्छीमारीसाठी आज पहाटे ५ च्या सुमारास देवगड बंदरातून समुद्रात जाण्यासाठी निघाली होती. देवगड किल्ल्यासमोर १० वाव पाण्यात बोटीच्या तळातील जॉईंटच्या फटीमधून पाणी शिरु लागल्याने बोट बुडू लागली. बोट बुडत असल्याने बोटीवरील तांडेल व खलाशी यांनी पाण्याची कॅन रिकामी करून जीव वाचविण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उडी मारली. या दरम्यान मच्छीमारीसाठी गेलेल्या अनंत नारकर यांच्या इंद्रायणी या नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी बुडत असलेल्या बोटीवरील खलाशी यांना वाचविले. मात्र, या बोटीवरील नितीन जयवंत कणेरकर याच्या हातातील कॅन सुटून गेल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला.
या घटनेची माहिती मालक तुषार पारकर व देवगड पोलिस यांना मिळतात स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने व पोलिस गस्तीनौका पंचगंगा यांच्या सहाय्याने बेपत्ता खलाशाची शोध मोहीम दिवसभर सुरू होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा पत्ता लागला नव्हता. या दुर्घटनेत नौकेला जलसमाधी मिळाल्याने नौका मालक तुषार पारकर यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे.