रत्नागिरी:- शिवजयंती निमित्त रत्नागिरीत गुरुवारी सायंकाळी भव्यदिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता जयस्तंभ येथून या शोभायात्रेचा शुभारंभ झाला. पारंपरिक वेशात महिला व पुरुष या शोभायात्रेत सहभागी झाले होते. तब्बल तीन तासांनी ही शोभायात्रा मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंती निमित्त दरवर्षी मराठा समाजाकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या शोभायात्रेला भव्यदिव्य स्वरूप आले होते. शोभायात्रा सुरू होण्यापूर्वी जयस्थंभ येथे साहसी खेळ दाखवण्यात आले. या यात्रेत सहभागी होण्यासाठी महिला आणि पुरुष वर्ग पारंपरिक वेशात फेटे घालून सहभागी झाले होते. तसेच ढोल पथके आणि झांज पथके देखील तैनात होती. घोड्यावर विराजमान लहानग्या शिवाजी राजांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शोभायात्रेला सुरुवात झाली. छत्रपती शिवरायांचा जयघोष करत शोभायात्रा निघाली. जयस्तंभ, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळनाका येथून ही शोभायात्रा मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यानजीक दाखल झाली. तब्बल तीन तासांनी जयस्तंभ येथील निघालेली शोभायात्रा मारुती मंदिर येथे दाखल झाली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शिवजयंती निमित्त प्रथमच मारुती मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रत्नागिरीकर सहभगी झाले होते.