सागरी महामार्गांवरील गणपतीपुळे, आंबोळगडचा होणार विकास

रत्नागिरी:- मुंबई ते कोकण प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी एमएसआरडीसीमार्फत ३८८ किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि ४९८ किमीचा रेवस ते रेडी सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) बांधण्यात येणार आहे. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि रायगडमधील १०५ गावांमध्ये १३ ग्रोथ सेंटर (विकास केंद्रे) विकसित केली जाणार आहेत. त्याचा आराखडा एमएसआरडीसी तयार करत आहे. त्यामध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळे व आंबोळगडचा समावेश आहे.

कोकणातील १०५ गावांतील विकासासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयानुसार पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ४४९.८३ चौ. किमी क्षेत्रफळात आता एमएसआरडीसीकडून १३ ग्रोथ सेंटर विकसित केली जाणार आहेत. मुंबई ते कोकण प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी एमएसआरडीसीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पालगत विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचे सांगत एमएसआरडीसीने विकास केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगडमधील १३ केंद्रे निश्चित केली आहेत. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला असून, अधिसूचना आचारसंहिता लागू होण्याआधी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विकास केंद्रांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे. कोकणातील चार जिल्ह्यांतील १०५ गावांमधील ४४९.८३ चौरस किमी क्षेत्रफळात विकास केंद्रे बनवण्यात येणार आहेत. सिडकोला अधिकार देण्यात आलेल्या १ हजार ६३५ गावांमधून ही १०५ गावे वेगळी काढून त्यासाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाली आहे.