देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या आंबव, (कोंडकदमराव) येथे दि.२७ मार्च रोजी गणपत दौलत जोशी यांचे आंबा-काजू बागेमध्ये असलेल्या विहिरीत बिबट्या मृता अवस्थेत सापडल्याची घटना घडली आहे.
गावचे पोलीस पाटील प्रकाश पांचाळ, यांनी दुरध्वनीव्दारे बिबट्या विहिरीमध्ये पडला असल्याची माहिती वन विभागाला दिली. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळतात वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता विहीरीमध्ये बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले. ही विहीर प्रकाश पांचाळ यांच्या आंबा-काजूच्या बागेमध्ये असून ती १० फूट व्यास, ३ फुट कठडा असलेली, २५ फूट खोल असून सदरची विहिर जांभा चिराने बांधकाम केलेली आहे. या विहीरीमध्ये ग्रामस्थांच्या मदतीने लाकडी शिडी विहीरीत सोडल्यानंतर खाली उतरुन दोरीचा फास टाकून बिबट्याला अलगत फासामध्ये अडकवून बाहेर घेण्यात आले. विहीरीमध्ये पडलेल्या मृत बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी देवरुख आनंदराव कदम याचे मार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले, सदरचा बिबट्या हा मादी प्रजातीचा असुन त्याचे वय साधारणपणे २ ते ३ वर्षाचा असुन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. बिबट्या हा भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचे दिसून आल्याचे वनविभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या बिबट्यास लाकडाची चिथा रचुन जाळुन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर करत आहेत.
सदरील कार्यवाही विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर तौफिक मुल्ला, वनरक्षक, आकाश कडूकर, अरुण माळी व पोलीस पाटील, प्रकाश पांचाळ, शशिकांत माने, प्रशांत जोशी, ग्रामस्थ उपस्थित होते. यांनी मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.