राजापूर:- राजापूर तालुक्यात सर्वत्र शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच मानपान, पूर्ववैमनस्यातून गावातील वादामुळे राजापूर तालुक्यातील केळवडे, डोंगर या दोन गावांमध्ये शिमगोत्सवासाठी १४४ कलम लागू करून मनाई करण्यात आली आहे.
कोकणात शिमगोत्सव हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. अनेक गांवांच्या हा सण साजरा करण्याच्या पध्दतीही वेगळ्या, अनोख्या आहेत. फाल्गुन महिन्याचे शुक्ल पक्षाचे पंचमी म्हणजेच फाकपंचमीला शिमगोत्सव सुरू होतो. तर धुलिवंदनाच्या दिवशी या सणाचा मुख्य पहिल्या टप्याची सांगता होते.
पण गावोगावी हा शिमगोत्सव साजरा करत असताना अनेकदा गावकरी, मानकरी यांच्यात वाद उभे राहतात. त्या वादांनी या आनंदाच्या उत्सवाला गालबोट लागते. गावात निर्माण होणारे मानपानाचे वाद शिमगोत्सवात आडवे येऊ नये, हे वाद समोपचाराने मिटवण्यासाठी तेथील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जातात. मात्र ज्या ठिकाणी वाद मिटवण्यात पोलिसांना यश येत नाही, अशा गावांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यातील केळवडे, डोंगर या दोन गावांमध्ये असलेल्या शिमगोत्सवातील वादाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गावातील शिमगोत्सवासाठी १४४ कलम लागू करून मनाई करण्यात आली आहे.