रेशन दुकानांमध्ये आय स्कॅनरसहीत ई-पॉस उपकरणे बसवणार

रत्नागिरी:- सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये आय स्कॅनरसहीत ई-पॉस उपकरणे बसविण्यात येणार आहेत. कोकण विभागात 3 वर्षे कालावधीसाठी हे काम करण्याकरिता कंपनीची निवडही करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाहीचे आदेश शासनस्तरावरून नुकतेच देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी, लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रास्तभाव दुकानांमध्ये 2जी/3जी ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या होत्या.

ही सेवा देणार्‍या संस्थाचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभाव दुकानांमध्ये नवीन ई-पॉस मशिन बसविण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार निवड झालेल्या कंपन्यांसोबत नुकताच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार करण्यात आला आहे. रास्तभाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई-पॉस 4जी मशीन व आय स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.