चिपळूणमधील दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूचा कसून तपास सुरू

पोलीस अधीक्षक; घातपात नसल्याचा प्राथमिक अंदाज

रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील कादवड येथील वैतरणा नदीच्या किनार्‍यावर दोन शाळकरी मुलीचा मृत्यू प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. प्रथमदर्शनी कोणताही घातपात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वैद्यकिय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे अचूक निदान होणार आहे. न्याय वैद्यक प्रयोगशाळेला पत्रव्यवहार करुन अहवाल तात्काळ देण्याची सुचना करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

वैतरणा नदीच्या पात्रात कादवड-कातकरवाडीतील मधुरा लवेल जाधव (वय १६, रा.पोसरे-खेड), सोनाली राजेंद्र निकम (१६ रा.कादवड) या दोन नववीतील मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूवून झाल्यानंतर त्यांनी कपडे वाळत घातले होते. बादली उलटी ठेवून त्या कपडे सुकण्याची वाट पाहत होत्या. याचा कालावधीत त्यांचा मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुली परत न आल्याने सोनालीच्या आईने एका मुलीला पहाण्यासाठी पाठविले होते. दोन्ही मुली निपचित पडून असल्याचे त्या मुलीने सांगितल्यामुळे नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक मुली बेशुद्ध होती. तर दुसरीचा मृत्यू झाला होता. कालांतराने दुसर्‍या मुलीचा हि मृत्यू झाला होता.

पोलीसांनी घटनास्थळावर केलेल्या पाहणीत कोणताही घातपात असल्याचे निष्पन्न झालेले नाही. मुलींच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे दोघींचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक पोलीसांच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घटनास्थळाची पाहाणी केली. मात्र त्यांनाही काहिही संशयास्पद आढळलेले नाही. तर वैद्यकिय अधिकार्‍यांनी व्हिसेरा प्रयोगशाळेकडे पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणाचे अचून निदान होणार आहे.

इयत्ता नववीमध्ये शिकणार्‍या मधुरा, सोनाली या अभ्यासात खुप हुशार होत्या. मृत्यू होण्याच्या आदल्यादिवशी त्या चिपळूण येथे महानाट्याचा प्रयोग पाहण्यासाठी शिक्षकांसोबत गेल्या होत्या.