समुद्री शेवाळाच्या शेतीमधून तालुक्यातील तीन गावात थेट रोजगार

रत्नागिरी:- समुद्री शेवाळाच्या शेतीमधून रत्नागिरी तालुक्यातील तीन गावांमधील सुमारे शंभर महिलांना थेट रोजगाराची संधी मिळाली आहे. गतवर्षी घेतलेल्या उत्पादनामधून पावणेसात टन समुद्री शेवाळ उत्पादित केले असून त्या माध्यमातून सुमारे पन्नास हजार रुपये मिळाले. रत्नागिरी तालुक्यातील काजिरभाटी, वरवडे आणि जयगड-पाटीलवाडी या गावातील महिला ही शेती करत आहेत.

महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग आणि 2022 साली ’क्लायमा क्रू प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्यात समुद्री शेवाळ शेतीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. याला महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कम्युनिटी सेंटरची मदत आहे. क्लायमा कंपनीने इंडियन सेंटर फॉर क्लायमेट अ‍ॅण्ड सोसायटल इम्पॅक्ट रिसर्चच्या मदतीने महिला शेतकर्‍यांना समुद्री शेवाळ लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.

तिन्ही गावांमध्ये ’कॅपाफायकस अल्वारेझी’ या प्रजातीच्या समुद्र शेवाळाची लागवड केली आहे. रत्नागिरीचे सागरी वातावरण या प्रजातीच्या वाढीसाठी पोषक आहे. तसेच तिची वाढ 45 दिवसात जलद गतीने होत असल्याने शेतीकरिता या प्रजातीची निवड करण्यात आली. लागवडीच्या पद्धतीत प्रामुख्याने बांबू तराफा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. एका तराफ्याला समुद्र शेवाळ बांधल्यानंतर साधारण 45 दिवसानंतर त्यामधून उत्पादन मिळते. तिन्ही गावांमध्ये केलेल्या शेतीमधुन एका तराफ्याला 40 किलो उत्पादन मिळाले. 169 तराफ्यातून 6 हजार 760 किलो शेवाळ मिळाले. त्याची आठ रुपये किलोने विक्री झाली. ही शेवाळ क्लायमा कंपनीने विकत घेतली.

समुद्री शेवाळाचे उपयोग

समुद्री शेवाळ हे ’मॅक्रो ऍलग्गे’ या गटात मोडते. ’समुद्री शेवाळ’ ही नवनिर्माण करण्यायोग्य सेंद्रीय सामुग्री आहे. त्याचा वापर जैवइंधन, बायोप्लास्टिक, सौंदर्य प्रसाधने, मानवी अन्न, खतनिर्मिती आणि औषधनिर्मिती होतो. रत्नागिरीत उत्पादित होणार्‍या ’कॅपाफायकस अल्वारेझी’ या समुद्री शेवाळापासून प्रामुख्याने सेंद्रिय खत, औषधनिर्मिती, बायोप्लास्टिक तयार केले जाते.

समुद्री शेवाळ शेतीमधून महिलांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. पुढील टप्प्यात सुमारे 400 राफ्ट किनार्‍यावर टाकण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे 25 टन शेवाळ मिळेल अशी अपेक्षा आहे. भविष्यात यामधून महिलांना कायमस्वरुपी रोजगार मिळू शकतो.

  • अंबरीश मेस्त्री, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ