जैवविविधता संवर्धनासाठी २०२५ मध्ये हाफ मॅरेथॉन

रत्नागिरी:- सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित दुसऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसाठी रन फॉर बायोडायव्हर्सिटी (जैवविविधता संवर्धन) ही संकल्पना घेतली आहे. या संकल्पेनेचे संगणकीय कळ दाबून उद्गघाटन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. सी फॅन्स हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ही संकल्पना मान्यवरांसमोर मांडण्यात आली व त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमही राबवण्याचे ठरवण्यात आले.

यंदापासून दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या रविवारी हाफ मॅरेथॉन होणार आहे. पुढील वर्षी ५ जानेवारीला स्पर्धा असली तरी याच्या कामाला नुकतीच सुरवात झाली. याप्रसंगी श्री. कुलकर्णी म्हणाले की, रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना खूप चांगली आहे. कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ घालतो. कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्याचे संवर्धन, जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. समुद्रकिनारे, कांदळवन, पक्षी, सह्याद्री रांगा आदींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. वणवा, भाजावळ, आगीमुळे तिथल्या जैवविविधतेला धोका पोहोचतो. जिल्हा पोलिस व प्रशासन आणि सर्वांनी मिळून एक चळवळ उभी करूया. प्लास्टिकचा वापर कमी करता येण्याकरिता कचरा संकलन, गावात कचरा फेकला जाऊ नये, याकरिता प्रयत्न करूया.
कोकण कोस्टल मॅरेथॉनचा लोगो असलेल्या आंबा बॉक्सचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये विशेष सहकार्य करणाऱ्यांचे कौतुक पोलिस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यात सौरभ मलुष्टे, गणेश धुरी, सुनील सहस्त्रबुद्धे, कांचन चांदोरकर, योगेश रजपूत, माधुरी कळंबटे, पराग पानवलकर, अॅड. पराग शिंदे, अभि इंदुलकर यांचा समावेश होता. कार्यक्रमाला सुधीर रिसबूड, सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत, राहुल पंडित, दर्शन जाधव, डॉ. नितीन सनगर, महेश सावंत, तेजा देवस्थळी, योगेश मोरे आणि प्रशांत आचार्य, ऋषिकेश सरपोतदार उपस्थित होते.