रत्नागिरी:- कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेला शिमगोत्सव. शिमगोत्सवात पत्येक ग्रामदेवतांच्या या सणाची एक प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात आदराची भावना आणि पिढ्यान्पिढ्या ह्या उत्सवाची परंपरा लाभलेली आहे. अशा या भक्तीपूर्ण उत्सवाला प्रारंभ झाला आहे. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागल्या आहेत. 1520 पालख्या धूलीवंदनापर्यंत भक्तांच्या भेटीला येणार आहेत. तर 1312 ठिकाणी सार्वजनिक तर 2840 खाजगी होळ्या उभारण्याला प्रारंभ झाला आहे.
कोकणात आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव जल्लोषात साजरा करण्याची फार पूर्वी पासूनची प्रथा आहे. फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या करून शिमगोत्सवाची सुरूवात होते. आठ दिवस हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यापमाणे शुकवार 14 मार्च फाल्गुन पंचमी (फाक पंचमी) पासून या जल्लोषी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. आठ दिवसांनी होळयांचा होम झाल्यानंतर ग्रामदेवतांच्या शिमगोत्सवाला सुरूवात होते. अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या पालख्या शिमगोत्सवाच्या दिवशी होळया घेण्यासाठी मंदीराबाहेर पडतात. ढोल ताशांच्या गजरात आणि फाकांच्या आवाजात पालख्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येते. काही ठिकाणी तर पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो आणि याला हजारो भक्तगण हजेरी लावतात.
शिमगोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल झाल्याने गावाचे वातावरण पूर्णत: बदलुन जाणार आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल होतात. फाक, ढोलांच्या निनादाने कोकण दणाणुन निघते. आपापल्या ग्रामदेवतांवरील ग्रामस्थांची निस्सीम भक्ती शिमगोत्सवातून दिसुन येते. अशा या शिमगोत्सवाची धुम साजरी करण्यासाठी त्यामुळे सारेच या आनंदोत्सवात नव्या जोशाने सहभागी होणार आहेत.