मिरकरवाडा जेटीवर अतिक्रमण करणाऱ्या मासळी विक्रत्यांवर कारवाई

मत्स्य विभाग; टब, टेबल, खुर्ची, फळ्या आदी साहित्य जप्त

रत्नागिरी:- वारंवार सांगून आणि इशारा देऊनही मिरकरवाडा जेटीवर मासळी विक्रत्यांकडून अतिक्रमण केले जात आहे. या विक्रेत्यांना मत्स्य विभागाने दणका दिला असून अतिक्रमण करणाऱ्यांचे टब, टेबल, खुर्ची, फळ्या आदी साहित्य जप्त केले आहे. मत्स्य विभागाच्या या कारवाईची विक्रत्यांनी धास्ती घेतली असून आता मिरकरवाडा जेटीने मोकळा श्वास घेतला आहे.

मिरकरवाडा जेटीच्या दोन्ही बाजूने मासळी विक्रत्यांनी अतिक्रमण केल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. अनेक वर्षांपासून ही कोंडी फोडण्यासाठी विक्रत्यांना सुसज्ज मच्छीमार्केट बांधून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार मासळी विक्रत्यांसाठी मोठे मच्छीमार्केट आणि ओटे बांधण्यात आले. मात्र त्याचे उद्गाटन झाल्यानंतर एक-दोन दिवस विक्रेते तिथे बसले आणि पुन्हा जेटीवरच बसणे सुरू केले. मत्स्य विभागाला याची कुणकुण लागताच जेटीवर ध्वनीक्षेपकाद्वारे अतिक्रमण करणाऱ्या विक्रत्यांना मार्केटमध्ये बसण्याच्या सूचना केल्या. दोन दिवस त्यासाठी मुदत दिली, तरीही विक्रत्यांनी न ऐकल्याने मत्स्य विभागाने धडक कारवाई केली. अतिक्रमन करून जेटीवर बसणाऱ्यांचे टब, टेबल, खुर्ची, फळ्या आदी साहित्य जप्त केले. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये जेटीवर कोणीही मासळी विक्री करताना दिसत नाही.