गरज पडल्यास रत्नागिरी शहरात एक दिवसाआड पाणी

रत्नागिरी:- पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला शीळ धरणातून पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी आठवड्यातून दोनवेळा पाणी कपात केली आहे. अगदीच पाणीपुरवठा कमी पडला तर पालकमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न योजनचे सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरात टॅंकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी दिले.

रत्नागिरी शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शीळ धरणाला भेट दिली. जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालिकेने आदीच खबरदारी घेतली आहे. सुरवातीला दर सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर आठवड्यातून सोमवार आणि गुरूवार अशी दोन दिवस पाणी कपात करावी लागली.
धरणातील पाणी झपाट्याने आटत असल्याने १ एप्रिलपासून दिवसाआड पाणी करण्याची वेळ पालिकेवर येणार आहे. गेल्या वर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानाचा मोठा फटका पाणीटंचाईवर झाला आहे. त्या अनुषंगाने पालिकेचा विचार सुरू झाला आहे. गेल्या वर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. नियमित पाणीपुरवठा करणे पाणीसाठा पाहता ते शक्य नाही. पाणीपुरवठा कमी पडल्यास शहराला टॅंकरने पाणी पुरवावे लागणार आहे.
सुदेश मयेकर, बिपिन बंदरकर, निमेश नायर, बारक्या हळदणकर, श्रद्धाताई हळदणकर, दीक्षा साळवी, सिद्धेश शिवलकर, अभिजित दुडये, विकास पाटील, शाखाप्रमुख प्रशांत सुर्वे, अमोल पावसकर, बाबू तळेकर, बाळू साळवी आदी या वेळी उपस्थित होते.