खाद्य स्टॉलवर सुडबुद्धीने कारवाई

मालगुंडमधील मयेकर कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायतीने सुडबुद्धीने खाद्यपदार्थांचे केवळ चार स्टॉलवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ मालगुंड येथील प्रणेश मयेकर यांनी आपल्या कुटुंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे मयेकर कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.

मालगुंड येथील प्रणेश मयेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे गणपतीपुळे समुद्र किनारपट्टीवर सुमारे २३ वर्षापासून भेळचे स्टॉल आहेत. गेली २३ वर्ष ग्रामपंचायत त्यांच्याकडून स्वच्छता कर दरवर्षी वसूल करत आहे. मात्र गणपतीपुळे समुद्र किनार्यांची सफाई जिंदाल कंपनी करत असल्याने स्टॉलधारकांकडून घेण्यात येणार्‍या कराचे ग्रामपंचायत काय करते याची माहिती विचारल्यामुळे ग्रामपंचायतीने सुडबुद्धीने चार स्टॉल जप्त करण्याची कारावाई केल्याचा आरोप श्री. मयेकर यांनी केला आहे. ग्रामपंचयात सरपंच व ग्रामसेवक आपल्या विरुद्ध पोलीस स्थानकात खोट्या तक्रारी दाखल करत असून आपला स्टॉल सुरु नसल्यामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
यापुर्वी आपण जिल्हाधिकार्‍यांसह जि.प. मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र आपल्याला न्याय मिळाला नाही. किनारपट्टीवर अन्य स्टॉल सुरु असताना केवळ आपल्यावरच ग्रामपंचयातीमार्फत अन्याय केला जात असल्याचे श्री.मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.