घरपट्टी थकबाकीदारांवर कठोर कारवाई; ७० मालमत्तांवर जप्ती, ३८ नळजोडण्या तोडल्या

रत्नागिरी:- शहरातील मालमत्ता कर थकीतदारांवरील कारवाईला वेग आला आहे. गेल्या दहा दिवसात तब्बल 70 पेक्षा अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर 38 नळ जोडण्या तोडून पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईमुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्रात गर्दी वाढू लागली आहे.

रत्नागिरी शहरातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी रक्कम भरण्यासाठी यावर्षी वेळच्या वेळी मागणी बिले देण्यात आली. या चालू वर्षाच्या करांसह थकीत करवसुलीसाठी मार्च महिन्याच्या प्रारंभीच वसुली पथके नेमण्यात आली. या वसुली पथकामध्ये अनेक वेळा स्वत: मुख्याधिकारी तुषार बाबरसुद्धा भाग घेत आहेत. चालू मागणीसह थकीत बिलांची रक्कम भरलेली नाही त्या मालमत्ता धारकांवर त्याचवेळी कारवाईसुद्धा केली जात आहे.

रत्नागिरी शहरात सोमवारपर्यंत 70 पेक्षा अधिक गाळे, सदनिकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर 38 नळ कनेक्शने तोडण्यात आली आहेत. कारवाई टाळण्यासाठी शहरवासीयांकडून करांची रक्कम भरण्यासाठी प्रतिसाद मिळू लागला असून बिलांची रक्कम भरण्यासाठी रनपच्या नागरी सुविधा केंद्रात रांगा लागत आहेत.
नगर विकास संचलनालयाकडून सर्वच नगर परिषद, नगर पंचायतींच्या उत्पना संदर्भात मुख्याधिकार्‍यांच्या दृकशाव्य बैठकीतून आढावा घेतला जात आहे. ज्या नगरपरिषदांच्या किंवा नगरपंचायतींच्या अपेक्षीत कर वसुली न झाल्याने उत्पन्नात घट दिसत आहे त्या मुख्याधिकार्‍यांना वरिष्ठ अधिकार्‍यांकडून फैलावर घेतले जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेची कर वसुली समाधानकारक असली तरी ती 100 टक्के नसल्याने त्या वसुलीसाठी रनपची तीन वसुली पथके कार्यालयीन दिवसांसह सुट्टीच्या दिवसातही वणवण करत आहे.