राजापूर:- वडिलोपर्जित जमीनीची शासकीय मोजणी लवकर करून देण्याच्या बदल्यात कार्यालयातील स्वतः च्या केबीनचे रंगकाम विनामोबदला करुन घेणाऱ्या राजापूर येथील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक सुशिल रामदास पवार याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी मुसक्या आवळल्या.
याबाबत ४३ वर्षीय तक्रारदाराने अँटी करप्शन खात्याकडे तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी लोकसेवक सुशिल रामदास पवार, उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय राजापूर. ता. राजापूर जि. रत्नागिरी याने तक्रारदार यांचे वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी स्वतः च्या केबीनचे रंगकाम विनामोबदला करून देण्याची दिनांक १ मार्च व ६ मार्च रोजी मागणी केली होती. त्यानुसार लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडून दिनांक ८ मार्च व १० मार्च या कालावधीत त्यांच्या केबिनचे रंगकाम विना मोबदला करून घेतले.
या अजब मागणीची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत खात्याकडे केल्यानंतर मंगळवारी आरोपी लोकसेवक यांना पंचा समक्ष ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.