मुरडव येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याची वनविभागाकडून सुटका

संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याची वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केल्याची घटना सोमवारी घडली आहे.

मुरडव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीत गवा रेडा पडल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. येथील ग्रामस्थ विजय कदम यांनी याची खबर वनपाल तौफिक मुल्ला यांना दिली. यानुसार वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. विहिरीमध्ये ४ फुटा पर्यंत पाणी होते. जेसीबीच्या सहाय्याने विहीर एका बाजूने खोदून रस्ता तयार करण्यात आला. ११ वाजता या गव्याची विहिरीतून सुखरूप सुटका झाली.

बचाव पथकामध्ये परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक आकाश कडुकर, अरुण माळी, गावचे सरपंच नितीन मेने, पोलीस पाटील राजू मेने व ग्रामस्थ सहभागी झाले होते. बचाव पथकास विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वन्यजीव रक्षक निलेश बापट यांचे मार्गदर्शन लाभले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास माहिती देण्याकरिता वनविभागाच्या टोल फ्री १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.