चिपळूण:- चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने सीमेवर पॉवरहाऊस परिसरात गुरूवारी 7 मार्च रोजी रस्त्याच्या बाजूला 33 के.व्ही. वीजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून लागलेल्या आगीत देवघर येथील बागायती जळून खाक झाली. यामध्ये सुमारे 950 आंबा, काजू, सागी झाडे होरपळल्याने सुमारे 3 लाखाचे नुकसान झाले.
मार्गताम्हाने येथील शेतकरी बागायदार संदीप कृष्णा चव्हाण यांचे पॉवरहाऊसजवळ देवघर हद्दीत मार्गताम्हाने- गोपाळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला साडेआठ एकर क्षेत्रात फार्महाऊस आहे. या क्षेत्रात आंबा, काजू, साग, खैर यांची लागवड केली आहे. येथूनच चिपळूणवरुन गुहागरकडे 33 के.व्ही.ची वीजवाहिनी गेली आहे. उच्च दाबाच्या असणाऱ्या या वीजवाहिनीच्या अचानक ठिणग्या पडल्या. यामुळे परिसरात मोठी आग लागली. ही आग पसरुन संदीप चव्हाण यांच्या फार्महाऊसमध्ये गेली. उन्हाचा भडका असल्याने आग फार्महाऊसच्या 8 एकर क्षेत्रात पसरली आणि क्षणार्धात येथील सर्व वनसंपदा खाक झाली.
या आगीत 100 आंबा कलमे, 200 काजू 200, 350 सागाची झाडे जळून गेली. तसेच खैर प्रजातीच्या झाडेही होरपळली. शिवाय पाणीपुरवठ्याची वाहिनीही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र भरदुपारी लागलेल्या या आगीला आवरणे कठीण झाले. महावितरणच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळी पाहणी करुन ही आग ठिणगी पडून लागल्याचे कबूल केले आहे. यामध्ये बागायतदार चव्हाण यांचे 3 लाखांचे नुकसान झाले असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी वीज कंपनीकडे केली आहे.