रत्नागिरीच्या तिघी महाराष्ट्र खो-खो संघात

राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व; अपेक्षा, श्रेया महिला संघात तर आर्या मुली गटात

रत्नागिरी:- जयपूर राजस्थान येथे होणार्‍या खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो लीग स्पर्धेसाठी 18 वर्षाखालील मुली गटात रत्नागिरीच्या आर्या डोर्लेकरची तर झांसी उत्तरप्रदेश येथे होणार्‍या महिला राष्ट्रीय खो-खो लिग स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार आणि श्रेया सनगरे यांची निवड झाली आहे.

भारतीय खेल प्राधिकरण व भारतीय खो-खो महासंघाच्यावतीने 8 ते 10 मार्च या कालावधीत जयपूर राजस्थान येथे राष्ट्रीय खो-खो लीग स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र मुली संघात अश्विनी शिंदे (कर्णधार), सुहानी धोत्रे, प्रणाली काळे, सृष्टी सुतार (सर्व धाराशिव), प्रतीक्षा बिराजदार, नयन काळे, धनश्री तामखडे (सर्व सांगली), दीपाली राठोड, पूर्वा वाघ (सर्व पुणे), सादिया मुल्ला, स्नेहल लामकाने (सर्व सोलापूर), आर्या डोर्लेकर (रत्नागिरी), साक्षी पार्सेकर (मु उपनगर), संस्कृती पाटील (ठाणे), काजळ मोरे (मुंबई), प्रशिक्षक विकास परदेशी, व्यवस्थापिका श्वेता गवळी यांची निवड झाली आहे.

तसेच उत्तरप्रदेश येथे 17 ते 19 मार्च या कालावधीत होणार्‍या राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरीच्या दोघींची निवड झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतार आणि श्रेया सनगरे यांचा समावेश आहे. दोन्ही संघांची घोषणा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी केली. या संघाना महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख, राज्य संघटनेचे माजी सचिव संदिप तावडे यांनी शुभेच्छा दिल्या. तिन्ही खेळाडूंना रत्नागिरीचे राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.