शीळ धरणात केवळ ४९ टक्के पाणीसाठा; आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

 रत्नागिरी:- रत्नागिरी शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी शिळ धरणाच्या सुधारित पाणी योजनेसाठी कोट्यावधी खर्च करूनही निसर्गापुढे हतबल होण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सरासरी पर्जन्यमानापेक्षा यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याने शिळ धरणात सध्या 49 टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनापर्यंत रत्नागिरी शहरात दर सोमवारी आणि दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.

शिळ धरणातील कमी पाणीसाठा झाला असून उष्ण तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे देखील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे शहरवासियांना आतापासूनच काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे. कारण पाणीपुरवठा करणाऱ्या नगर परिषदेच्या शीळ धरणात सध्या 1 मार्च 2024 रोजी 1.828 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा (60 टक्के) शिल्लक होता. गेल्या हंगामात मान्सूनवर अल-निनोचा राहिलेला प्रभाव व झालेल्या कमी पर्जन्यमानाने पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी वाढत्या उन्हाळ्याच्या काळात तापमानातील चढ-उतार व त्यामुळे पाण्याच्या होणाऱया बाष्पीभवनाचा वेग यावर या धरणातील पाणीसाठा यावर पुढील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी शहराला शहराला दररोज 19 ते 20 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता 4.301 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पण शीळ धरणात गेल्या फेब्रुवारीच्या मध्यावर 2.051 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. त्यामुळे हा पाणीसाठा पाहता आगामी काळासाठी शहरवासियांवर काटकसरीने पाणीवापर करण्याची वेळ येणार यांची शक्यता पशासनाने वर्तवलेली होती. गेल्या वर्षी म्हणजेच 1 मार्च 2023 रोजी शिळ धरणात 1.955 दशलक्ष घनमिटर एवढा पाणी साठा होता. तर आता 1 मार्च 2024 रोजी 1.828 दशलक्ष घनमिटर एवढा पाणी साठा होता. सध्या 49 टक्के एवढाच पाणी साठा धरणात शिल्लक आहे.
शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेवर सुमारे 73 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही पाणीयोजना सुरू करण्यात आली आहे. शहरात सुमारे 10 हजार 288 हून अधिक नळजोडण्या आहेत. त्या नागरिकांना प्रतिदिन 19 ते 20 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पानवल धरणाची दुरूस्ती रखडलीय आणि नाचणे येथील पाणीपुरवठा केंद्राच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शहराला एकट्या शीळ धरणातून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. पण गतवर्षी मान्सून कमी राहिल्याने येथील पाणीपुरवठा करणाऱया जलस्त्रोतांवर त्यातील पाणीसाठ्यांवर परिणाम झाला आहे.

तीव्र उन्हाळ्याच्या झळा सुरू झालेल्या आहेत. मार्चपासून सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढू लागलेला आहे. उन्हाळ्यातील वाढते तापमान व होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग यावर धरणातील पाणीसाठ्याची पातळीवर न.प.पशासनामार्पत निगराणी ठेवली जात आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे संकट येऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाचे प्रयत्न होते. पण मान्सूनच्या आगमनापर्यंत रत्नागिरी शहरात दर सोमवारी आणि दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ न.प.प्रशासनावर आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी काटकसरीने करावा आणि नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे