रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपचीच: प्रमोद सावंत

रत्नागिरी:- रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर यापूर्वी जनसंघ व भाजपाचे वर्चस्व राहिलेले आहे. मागील काहीवर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय झालेला आहे. त्यामुळे ‘यही समय है, सही समय है’ रत्नागिरी लोकसभा कुणाला सोडण्याचा प्रश्नच नाही, हा मागायचाही विषय नाही. हक्काने सांगतो याठिकाणी कमळच फुलणार अशी स्पष्ट भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

रत्नागिरीसह रायगड व मावळमध्ये यावेळी कमळ फुलणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
भारतीय जनता पार्टी दक्षिण जिल्हा रत्नागिरीच्यावतीने आयोजित कार्यकर्ता व बुथप्रमुखांच्या मेळाव्याला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मार्गदर्शन करताना, कार्यकर्त्यांच्या मनासारखे व्हायचे असेल तर कामाला लागा असे स्पष्ट संकेत दिले. आपण मावळपासून रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा दौरा करीत असून तीनही मतदार संघात भाजपाला अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे ‘यही समय है, सही समय है’ असल्याचे सांगत, मागील दहा वर्षात येथील खासदारांनी काही केले नाही त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्यांनी आधी लोकसभेचा विचार करावा, मग विधानसभेचा करुया असे त्यांनी संगितले. मोदी सरकार हे कुणा जातीधर्माच्या विरोधात नाही. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे. या भागाचा विकास करायचा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार भाजपचा आल्यावरच बहुतेक मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. येथील खासदारांना अद्याप फास्ट स्पीडने काम जमलेले नाही. त्यामुळे मागील दहा वर्षात विकास काय केला हे आता प्रत्येकाने विचारायला हवे, असे स्पष्ट मत डॉ. सावंत यांनी व्यक्त केले.

यापूर्वी फक्त पाट्या लावण्याचे काम काँग्रेसने केले. परंतु पंतप्रधान पदी आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पाट्या लावण्याबरोबरच त्याच्या उद्घाटनाचे कामही त्यांनी केले. त्यामुळे आता प्रत्येक वेळी मोदींची गँरंटी दिली जात आहे.

मागील 60 वर्षात जे झाले नाही ते 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवले. यापूर्वी एक रुपयातील फक्त पंधरा पैसे जनतेच्या वाट्याला यायचे आणि पंच्याऐंशी पैसे कुठे झिरपायचे हे सर्वांनाच माहित आहे. त्यांना आता धडा शिकवायचा आहे. पंतप्रधान मोदी यांनी थेट नागरिकांच्या अकाऊंटमध्ये त्या-त्या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरमुळे पैसे वाटपात सुसूत्रता आली. सत्ता ही सेवा व सुशासन आणण्यासाठी पाहिजे. मागील काही वर्षात देशाचा ईतिहास पुसण्याचे काम काँग्रेस राजवटीने केले आहे. स्वा. सावरकरांचा अपमान करण्याचे काम काँग्रेसने केल्याचे त्यांनी सांगितले.

राहूल गांधी हे काँग्रेसचे नेतृत्वच नाही, त्यांना ईतिहास माहित नाही असे सांगतानाच आणखी किती पक्ष येतील आणि जातील पण भाजपा आहे तिथेच आहे असे डॉ. सावंत म्हणाले. उमेदवारी कुणाला मिळणार हा रत्नागिरीकरांचा प्रश्न छोटा आहे. परंतु कमळ फुलवायचे असल्यास प्रत्येक बुथवर काम झाले पाहिजे, कार्यकर्त्यांनी आताच कष्ट घ्यायला हवे, तरच खासदार निवडून आल्यावरच ग्रामपंचायत सरपंचांसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर आपण भाजपचा झेंडा फडकावू शकतो असे स्पष्ट मत डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

या कार्यकर्ता मेळाव्याला भाजपाचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शैलेंद्र दळवी, लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, बाळासाहेब पाटील, लोकसभा सहप्रभारी बाळ माने, अ‍ॅड. बाबासाहेब परुळेकर, महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी, सौ. शिल्पा मराठे, संगमेश्वर प्रभारी प्रमोद अधटराव, अशोक मयेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने बुथप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, अतुल काळसेकर, माजी आ.बाळ माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सौ. सुजाता साळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत हे कार्यकर्त्यांमध्ये आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांसोबत फोटो घेतले.

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चांगले काम करीत आहेत. या ठिकाणी भाजपा आणखी दोन पक्षांसह सत्तेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही बोलायच म्हटलं तर भिती वाटते असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हणताच स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात एकच हशा पिकला.