रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथे महाशिवरात्रीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मार्च ते ११ मार्च या कालावधीत हा सोहळा पार पडणार असून या कालावधीत विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काळबादेवी येथे श्री देव रामेश्वराचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्याची प्रथा आहे. यावर्षी देखील या मंदिरामध्ये श्री देव रामेश्वर, कालिका देवस्थान ट्रस्ट आणि उत्सव कमिटी यांच्यावतीने महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाशिवरात्र सोहळ्याची सुरुवात ७ मार्च पासून होणार आहे. ७ मार्च रोजी रात्री १० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. काळबादेवी गाव मर्यादित इयत्ता पहिली ते सातवी या गटात जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेनंतर लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक, दुपारी १२ वाजता कीर्तन, दुपारी २.३० वाजता पालखी प्रदक्षिणा आणि रात्री ९ वाजता अखंड परायाणाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार ९ मार्च रोजी रात्री १० वाजता शालेय विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम, रात्री ११ वाजता जे एन पी टी कलमंच उरण यांच्याकडून ‘ मृत्यू विकणे आहे ‘ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. रविवार १० मार्च रोजी रात्री १० वाजता भूमिका थिएटर प्रकाशित, श्री कला प्रोडक्शन निर्मित सर्किट हाऊस हे नाटक सादर करण्यात येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने सिनेस्टार संजय नार्वेकर काळबादेवी येथे हजेरी लावणार आहेत. सोमवार ११ मरच रोजी रात्री १० वाजता कै. प्रभाकर भोळे स्मृती कलामंच निर्मित ‘ करून गेलो गाव ‘ हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. महाशिवरात्र निमित्त काळबादेवी येथे आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजंकाकडून करण्यात आले आहे.