रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम अखेर सुरू

निर्माण ग्रुपला ठेका; १८ कोटीच्या कामाला लवकरच गती

रत्नागिरी:- रखडलेल्या रत्नागिरीच्या हायटेक बसस्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. जुन्या कामावरून नवीन काम सुरू केले जाणार असल्याने लेआऊटचा विचार करून दुसऱ्या टप्प्यात बांधकामाला गती दिली जाणार आहे. याला निर्माण ग्रुपने दुजोरा दिला. १८ कोटीचे हे काम असून, त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निधी उपलब्ध करून दिला आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे रखडलेल्या या कामाला मुहूर्त मिळाला आहे. जुन्या ठेकेदाराने हे काम करण्यास नकार दिल्याने त्याचा ठेका रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया करण्यात आली. रत्नागिरीच्या निर्माण ग्रुपला हा ठेका मिळाला आहे. या कामाला कालमर्यादा घालून घेतली आहे. पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १० कोटीचे हे काम होते. कोरोनामुळे कामाला ब्रेक लागला. त्यानंतर ते अद्यापपर्यंत अपूर्णच होते. कामाची रक्कम वाढत गेली. त्यामुळे ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला. महामंडळालादेखील एवढी रक्कम देणे शक्य नव्हते. पालकमंत्री उदय सामंत यांनी यामध्ये तोडगा काढला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत याला १८ कोटीचा निधी दिला. निर्माण ग्रुपकडे हे काम गेल्याने कामाला सुरवातही झाली आहे. पहिल्या ठेकेदाराने बसस्थानकाच्या पाया उभारला आहे. त्या कामाचा आराखडा पाहून निर्माण ग्रुपने आता त्यावर चिऱ्याचे बांधकाम सुरू केले आहे.