रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक विषयाचे अद्यावत ज्ञान आवश्यक असल्यामुळे विंडोज ऑपरेटींग सिस्टीमसहीत संगणक संच उपलब्ध करून मिळावेत म्हणून जिल्हापरिषदेकडून बँकेकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे १०० संगणक संच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील ५० संच नुकतेच जिल्हापरिषदेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
बँकेच्या कार्यालयात अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्यासह उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांच्या उपस्थितीत संगणक प्रदान कार्यक्रम झाला. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वःखर्चाने संगणक संच घेणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गरज तसेच संगणकाचा त्यांना भविष्यकाळात होणारा उपयोग या बाबी विचारांत घेऊन, जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे १०० संगणक संच देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांकरीता २ टप्प्यांत संगणक संच देण्याच निर्णय घेण्यात आला होता. हे संगणक जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी हनुमंत सुर्वे व उपमुख्य लेखाधिकारी संजय कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच उर्वरित ५० संगणक संच २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुपूर्द करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतात. त्यांच्यासाठी हे संगणक उपयुक्त ठरणार असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.