जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना कृषी विषयक राज्यस्तरीय पुरस्कार

रत्नागिरी:- कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शेतकरी किंवा संस्थांना दिले जाणारे 2020, 2021 व 2022 या वर्षातील राज्यस्तरीय पुरस्कार शासनाने आज जाहीर केले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सहा शेतकर्‍यांचा समावेश आहे. आंबा-काजूसह शेतीमध्ये विविध प्रयोग केल्यामुळे या शेतकर्‍यांना सन्मानित केले जाणार आहे.

शासनाकडून जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये 2021 या वर्षातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दापोली तालुक्यातील कुडावळे येथील शेतकरी विनायक श्रीकृष्ण महाजन यांना जाहीर झाला आहे. याच वर्षातील युवा शेतकरी पुरस्कार कुंभवे-साकळोलीतील अनिल हरिश्चंद्र शिगवण (ता. दापोली) तर सर्वसाधारण गटातून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार हेमंत यज्ञेश्वर फाटक (मु. चिचंखरी, ता. जि. रत्नागिरी) यांना देण्यात येणार आहे. तसेच 2022 या वर्षातील युवा शेतकरी पुरस्कार लांजा येथील मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना, उद्यानपंडीत पुरस्कार डोर्लेतील अजय तेंडुलकर (ता. रत्नागिरी), सर्वसाधारण गटातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार संतोष शांताराम वाघे (ता. निर्व्हाळ, ता. चिपळूण) यांना दिला जाणार आहे.