चिपळूण:- दुचाकीने पती-पत्नी प्रवास करत असताना दुचाकी खड्यात आदळून अपघात झाल्याची घटना तालुक्यातील असुर्डे ते आंबतखोल मार्गावर ऑगस्ट 2023 मध्ये घडली होती. या अपघातातील जखमी पत्नीवर मुंबई येथे उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला होता. याप्रकरणी सहा महिन्यानंतर पतीवर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ताराम यशवंत चोगले (58, असुर्डे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मनीष रघुनाथ कांबळे (सावर्डे पोलीस स्थानक) यांनी दिली. तसेच दर्शना दत्ताराम चोगले (46, असुर्डे-निर्मळवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ताराम चोगले व त्यांची पत्नी दर्शना चोगले असे दोघेजण 12 ऑगस्ट 2023 रोजी दुचाकीने असुर्डे ते आंबतखोल असा प्रवास करीत होते. यावेळी खड्ड्यात दुचाकी आपटल्याने पाठीमागे बसलेल्या दर्शना चोगले या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रथम उपचारासाठी डेरवण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा 13 ऑगस्ट 2023 रोजी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरे यांनी घोषित केले. या अपघातप्रकरणी 6 महिन्यानंतर पती दत्ताराम चोगले याच्यावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.