जिल्ह्यातील एक हजार आशा, गटप्रवर्तक मुंबईकडे रवाना

रत्नागिरी:- मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर दोन दिवसात निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंदोलन तिव्र करण्यात येणार असून आयटक फेडरेशनने राज्यातील सर्व आशा, गटप्रवर्तक महिलांना 20 फेब्रुवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजारहून अधिक महिला सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रातील 76000 आशा व गटप्रवर्तक महिलांनी 12 जानेवारीपासून बेमुदत संपाला सुरुवात केली होती. संपाबरोबरच अनेक जिल्ह्यामध्ये आणि मुंबई आझाद मैदान मध्ये प्रचंड निदर्शने आंदोलनेही झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिवशी ठाण्यामध्ये तीस हजार महिलांनी जाऊन मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. 1 ऑक्टोबर 2023 रोजी बेमुदत संपाची नोटीस दिल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या मंजूर केलेल्या नाहीत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व दोन हजार रुपये भाऊबीज आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ देण्याबद्दल निर्णय दिला. परंतु त्याची अंमलबजावणी तर शासनाने केलीच नाही. उलट आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधनवाढ निर्णय घेण्याचा आरोग्यमंत्र्यांना अधिकारच नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारे मंजूर केलेल्या मागण्या महाराष्ट्र शासन उधळत आहे, असा आरोप आयटक फेडरेशनने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाण यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 14 फेब्रुवारी भेट घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले की आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढ देण्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. आझाद मैदानामधूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. करी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी दोन दिवसांमध्ये अहवाल देण्यात येईल. मात्र हे दोन दिवस आता पूर्ण झालेले आहेत. तरीही अद्याप अहवाल दिलेला नाही. म्हणूनच मंगळवारपासून महाराष्ट्रातील सर्व सर्व आशा गट प्रवर्तक महिलांचे तीव्र आंदोलन करण्यासाठी सर्वांनी मुंबईच्या येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आझाद मैदानात संपावरील महिलाना भेट देऊन आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या मान्य होण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले आहेत.

मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबई आझाद मैदानात एकत्र यावयाचे आहे. या मैदानात आंदोलनाला बसावयाचे आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले त्याला दोन दिवस पुर्ण होऊन गेले आहेत. त्यामुळे हे आंदोलन तिव्र करणार आहोत.

  • -शंकर पुजारी, अध्यक्ष, आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशन