‘थ्रिप्स’ ला रोखण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक ऑनफिल्ड

रत्नागिरी:- बदलत्या वातावरणामुळे हापूसवरील फुलकीडीचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागायतदारांना कसरत करावी लागत आहे. हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फेरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी कोकण कृषी विद्यापिठाच्या संशोधकांनी बागांमध्ये येऊन मार्गदर्शन करण्याचे साकडे घातले. त्यानुसार शुक्रवारपासून (ता. 16) कार्यवाही सुरू झाली असून पोमेंडी येथील बागेत औषध फवारणी करण्यात आली.

दापोली कृषी विद्यापीठ येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्यासह संशोधकांसोबत आंबा बागायतदारांनी चर्चा केली. फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बागायतदारांनी विनंती केली. या वेळी रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार शेतकरी अध्यक्ष प्रदीप सावंत, राजन कदम, राजू पेडणेकर, अजित शिंदे यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते. याप्रसंगी शास्त्रज्ञांनी पुढील वर्षापर्यंत प्रयत्न करू असे आश्वासन दिले. याबाबत आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी सांगितले, आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संशोधकांनी रत्नागिरीतील बागांमध्ये येऊन पाहणी करावी. त्यांच्या सुचनेनुसार औषध फवारणी केली जाईल. थ्रिप्स कमी झाला नाही तर मोठे नुकसान होणार आहे.
बागायतदारांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे सांगण्यात आले. सध्या कर्मचारी कमी असल्यामुळे बागांमध्ये जाणे शक्य नाही. त्यामुळे शक्य होईल तेव्हा संशोधक आंबा बागांना भेटी देतील.

दरम्यान, संशोधकांचे पथक शुक्रवारी (ता. 16) पोमेंडी येथील अजित शिंदे यांच्या बागेमध्ये दाखल झाले. त्यांनी आंबा बागेची पाहणी केली. थ्रिप्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक औषधे झाडांना देण्यात आली आहे. त्याचा प्रभाव पुढील काही दिवसात दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर या पथकाने विद्यापीठाकडून प्रायोगिक तत्त्वावर संशोधनासाठी घेतलेल्या गोळप येथील आंबा बागेला भेट दिली.


कोकण कृषी विद्यापिठाच्या कुलगुरुंकडे केलेल्या मागणीनुसार आज संशोधक रत्नागिरीत आले होते. त्यांनी बागेची पाहणी करून औषधेही दिली आहे. त्यामुळे थ्रिप्सवर काही अंशी नियंत्रण ठेवता येईल अशी आमची अपेक्षा आहे. पुढील आठवड्यातही ते येणार आहेत.

  • प्रदीप सावंत, अध्यक्ष, जिल्हा आंबा उत्पादक संघ