जिल्ह्यात जलजीवन योजनेतील सुरू असलेली कामे बोगस

रत्नागिरी:- जलजीवन मिशन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली पाणी योजनांची कामे हा केवळ दिखावा असून 25 टक्केसुद्धा कामे झालेली नसल्याची बाब शासनासमोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या योजनेच्या कामांची चौकशी होणार आहे. जिल्ह्यातील 714 योजनांच्या कामांची थर्ड पार्टीतर्फे केलेल्या पडताळणीत 294 किरकोळ तर 261 गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली. त्या पमुख निरीक्षणांपैकी 190 निरीक्षणातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गंत गावोगावी मोठ्याप्रमाणात नळपाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली कामे अजूनही पूर्णत्वाकडे जाताना दिसत नाहीत. या कामांतील दिरंगाईची आणि त्या कामांचा दर्जा या बाबी उघड झाल्यानंतर शासनस्तरावरून ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेतली आहे. त्यांनी तत्काळ विशेष पथक पाठवून जिल्ह्यातील गुहागरसह या योजनेतील सर्व कामांची तपासणी, सखोल चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले. ही बाब आमदार भास्कर जाधव यांनी समोर आणली. त्यात तथ्य असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित सैनी यांनी मान्य केलेले आहे.

जलजीवन मिशन योजनेतील कामांचा उडालेला बोजवारा आणि जिल्ह्याचा टंचाई आराखडा वेळेत तयार झालेला नव्हता. यावर विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी दिले होते. त्यानुसार मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक झाली.

या बैठकीत जलजीवनच्या कामांवरून जोरदार चर्चा झाली. पत नसलेल्या एकेका ठेकेदाराने शंभर शंभर कोटींची कामे घेऊन ठेवली असून ते कामे करत नाहीत. झालेल्या कामांनाही दर्जा नाही. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार आणि कार्यकारी अभियंता मयूरी पाटील या दोघांचा जिल्ह्यात संपर्क नाही. ते कुठल्याही कामाच्या ठिकाणी जात नाहीत, दर्जाहीन कामाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी बैठकीत केला होता.

या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून संबंधितांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कारवाई झाली नाही. तसेच जि.प.पाणीपुरवठा विभागाकडूनही समाधानकारक उत्तर त्यावेळी मिळाले नाही. या विषयी नाराजी व्यक्त करत मंत्री पाटील यांनी ठेकेदारांना काढून टाकण्याचे आदेश दिले. कामांच्या तपासणीसाठी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता, ठाणे यांचे विशेष पथक तत्काळ गुहागरसह जिह्यात पाठवण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे या चौकशीच्या कारवाईतून काय समोर याकडे साऱया जिल्हावासियांचे लक्ष वेधले आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद स्तरावर सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाबाबत पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 714 योजनांची संख्या आहे. त्या सुरू असलेल्या योजनांच्या कामांसाठी थर्ट पार्टीकडुन निरीक्षणे वेळोवेळी नोंदवण्यात आलेली आहेत. आतापर्यंत 917 निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. योजनांच्या केलेल्या पडताळणीत कामांच्या ठिकाणी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत, वापरण्यात आलेली पाईप लाईन आणि त्याचा दर्जा, टाक्यांची रचना, प्रलंबित कामांचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये 273 निरीक्षणे नगण्य स्वरूपाची आहेत. त्या सर्व निरीक्षणातील त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे. 294 निरीक्षणे ही किरकोळ स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 235 निरीक्षणांचे निराकरण करण्यात आले असून अजूनही 59 निरीक्षणे प्रलंबित आहेत. तर 261 निरीक्षणे ही गंभीर स्वरूपाची आढळल्याची बाब समोर आली. त्यापैकी 190 निरीक्षणांची पूर्ततेची कार्यवाही करण्यात आली असून अजूनही 71 निरीक्षणे प्रलंबित राहिली आहेत.

याबाबत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जिल्हा परिषदस्तरावर जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवनच्या कामांबाबत सातत्याने कटाक्ष ठेवला जात आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, त्या अनुषंगाने कामांना प्रत्यक्ष भेटीत पाहणीही केली जात असल्याचे सांगितले आहे.