दापोली:- दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ईडीने केलेल्या अटकेनंतर तब्बल ११ महिन्यांनंतर त्यांना जामीन मिळाला आहे.
दापोली मुरूड येथे विविध नियमांचे उल्लंघन करून समुद्रकिनारी साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा मुद्दा भाजपचे किरीट सोमय्या यांनी उचलला. त्यांनी याप्रकरणी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांना लक्ष्य केले होते. ज्या वादग्रस्त रिसॉर्टवरून हा मुद्दा सुरू होता, ते अनिल परब यांनी सदानंद कदम यांना विकले होते. त्यामुळे ईडीने सदानंद कदम यांना १० मार्च २०२३ रोजी चार तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरणी ही कारवाई झाली.
यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या निर्णयाला कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल १ डिसेंबरला राखून ठेवला होता. तो नंतर जाहीर करून कदम यांना दिलासा देण्यास नकार देण्यात आला होता.
उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सदानंद कदम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. अखेर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.