गाय आडवी आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

दापोली:- बचत गटाच्या कामासाठी करंजाणी येथे जात असताना गाय आडवी आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एक महिला जखमी झाली आहे. हा अपघात विसापूर (ता. दापोली) येथे मंगळवारी सकाळी १०:४५ वाजण्याच्या दरम्यान झाला.

स्वाती गोरीवले (४५, रा. मुगीज, दापोली), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, पूनम वेदक (४०, रा. भाटघर- मुगीज, दापोली) या जखमी झाल्या आहेत. पूनम वेदक व स्वाती गोरीवले दापोली तालुक्यातील पालगड महिला बचत गटाच्या कामासंदर्भातील सभेकरिता करंजाणी येथे जात होत्या. पूनम वेदक दुचाकी (एमएच- ०८- एवाय २८७२) वरून स्वाती गोरीवले यांना घेऊन जात होत्या. मुगीज येथून निघाल्यानंतर विसापूर या ठिकाणी असणाऱ्या विकास आळकुंठे यांच्या घरासमोर गाडी आली असता रस्त्यावर अचानक एक गाय धावत आली. या गाईने हुलकावणी दिल्याने पूनम वेदक यांचा गाडीवरील ताबा सुटला व दुचाकी घसरून अपघात झाला.

या अपघातामध्ये स्वाती गोरीवले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचाराकरिता तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या अपघातप्रकरणी पूनम वेदक यांचे पती संदीप गोरीवले यांनी दापोली पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या अपघातप्रकरणी आणि स्वाती गोरीवले यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक पूनम वेदक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.