करंजारी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला अकरा तासानंतर जीवदान

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील करंजारी बाजारपेठ येथील विलास बेर्डे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे मंगळवारी (दि.२) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाकडून बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर तब्बल ११ तासांनंतर या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी, आपल्या विहिरीत बिबट्या पडल्याचे सकाळी सातच्या सुमारास विलास बेर्डे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, पालीचे वनपाल गावडे तसेच देवरूख व पालीचे वनरक्षक यांनी घटनास्थळी पिंजऱ्यासह धाव घेतली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागामार्फत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याचे रेस्क्यू आँपरेशन सुरू करण्यात आले. दिवसभर हे रेस्क्यू आँपरेशन सुरू होते. विहिरीतील एका बाजूला असलेल्या काचरात हा बिबट्या लपून बसल्याने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला अपयश येत होते. मात्र ११ तासाच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाने बिबट्याला विहिरीबाहेर काढले.