शेततळे प्रस्तावांपैकी सव्वादोनशे प्रस्ताव तांत्रिक कारणांमुळे रखडले

रत्नागिरी:- रब्बी हंगामातही शेतकर्‍यांना लागवडीसाठी उद्युक्त करताना मागेल त्याला शेततळे योजना प्राधान्याने कोकणात राबवण्यात आली. मात्र, ऑनलाईन प्रस्तावित असलेल्या या योजनेबाबत शेतकरी अनभिज्ञ असताना पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी सव्वादोनशे प्रस्ताव तांत्रिक त्रुटीमुळे रखडलेले आहेत.

खरीप हंगामाची चारमाही शेती व्यतिरिक्त कोकणातही बारमाही शेती करता यावी यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे योजना कोकणात प्राधान्याने राबविली. योजनेंतर्गत कोकणातील भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन शेततळ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी राज्य शासनाच्या महाडिबीटी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेता येणार होता. यासाठी ऑनलाईन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र ऑनलाईन प्रस्तावाबाबत येथील शेतकरी अनभिज्ञ राहिल्याने योजनेला अतल्प प्रतिसाद मिळाला.

शेतळ्यांसाठी पाविण्यात आलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील 67, रायगड मधील 102 आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील 56 प्रस्ताव रखडलेले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात पाठविण्यात आलेले प्रस्ताव पावसाळ्यापूर्वी मंजूर होणे अपेक्षित असताना त्यामध्ये आधार लिंक नसणे, सातबारावर बोजा असणे आदी तांत्रिक कारणाने हे प्रस्ताव रखडले. परिणामी पावसाळा गेल्यानंतर कागदावरच राहिलेले प्रस्ताव नव्या आर्थिक वर्षात कोरडेच राहिले आहेत.