सांगली:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरु झालेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सकाळच्या सत्रात साखळी सामन्यात पुरुष गटात यजमान सांगली, महिला गटात धाराशिव, रत्नागिरी, पुणे तर किशोर गटात पुणे व किशोरी गटात सोलापूर ने विजयी सुरुवात केली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, सांगली जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून आजपासून (ता. ५ ) पुढे ८ फेब्रुवारी या स्पर्धा चालू राहतील. कुपवाड येथील अकूज ड्रीमलेंड (ता. मिरज जि. सांगली) येथे सामने सुरु आहेत.
साखळी सामन्यात किशोर गटात पुणे संघाने नागपूरचा (13-9) एक डाव 4 गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे सुशांत कोळी (3 मि. संरक्षण व 2 गुण), आर्यन हलमे (1.40 मि. संरक्षण व 2 गुण ), साहिल वाडरिवे (1.40 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी उत्कृष्ठ खेळ केला. नागपूरतर्फे ललित सोनुले, अंश भागत याची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही.
किशोरी गटात सोलापूर ने चंद्रपूरचा 8 गुणांनी (13-5) पराभव केला. यामध्ये आर्या चोरमुले (5.30 मि. संरक्षण व 2 गुण), श्रावणी देठे (2.30 मि. संरक्षण व 1 गुण ) या खेळाडूंचे महत्वाचे योगदान होते. चंद्रपूर तर्फे देवी कुशवाह व अर्पिता यांनी चांगला खेळ केला.
महिला गटात रत्नागिरी संघाने चंद्रपूर चा एक डाव 3 गुणांनी (11 – 3) पराभव केला. विजयी संघातर्फे पायल पवार (3.40 मि., 2.30 मि. संरक्षण व 3 गुण ), अपेक्षा सुतार (2.40 मि. नाबाद संरक्षण व 4 गुण), साक्षी डाफळे (1.40 मि. संरक्षण ), श्रेया सनगरे (1.40 मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला.
पुणे संघाने अमरावतीचा 1 डाव 7 गुणांनी (20-7) पराभव केला. विजयी संघातर्फे दिव्या जाधव (2 मि. संरक्षण ), ऋतिका राठोड (2.30 मि. संरक्षण), दीपाली राठोड (4 गुण), भाग्यश्री बडे (2.00 मि. संरक्षण व 6 गुण) यांनी चांगला खेळ केला. अमरावती संघातर्फे रागिणी लोखंडे (1.40 मि. संरक्षण व 1 गुण ) हिने चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात धाराशिव संघाने नागपूर चा सहज पराभव केला. त्यात किरण शिंदे (3 मि. संरक्षण), प्रीती काळे (3.30 मि. संरक्षण ), अश्विनी शिंदे (3.10 मि. व 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला. पराभूत नागपूर तर्फे यशोधा उमरे (1.20 मि. संरक्षण), नेहा पेठे (1 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केला.
तर कोल्हापूर संघाने ठाणे संघाचा 1 गुणांनी पराभव केला.